भाजप शब्दांचे पक्के, देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत एनडीएने आपली सत्ता कायम राखली आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी म्हणूण जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले. भाजप आपल्या शब्दांचे पक्के आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री जेडीयूचा होईल आणि ते नितीश कुमार असतील हे आधीच ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही. भाजप शब्दांचे पक्के आहे. महाराष्ट्रात देखील मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री भाजपचा होईल अशी घोषणा केली होती.त्यावर आम्ही अडून राहिलो.तर मोदींनी बिहार येथे जेडीयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली असून आम्हाला ती मान्य आहे. तसेच चीत झाले तरी आमचे बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय असल्याचे म्हणत, त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मॅन ऑफ द मॅच सीरिज मोदी आणि भाजपच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवारांचे डिपॉझिट वाचले नाही, नोटा पेक्षाही त्यांना कमी मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेने आत्मचिंतन केले पाहिजे, असा जोरदार टोला त्यांनी हाणला.

बिहारचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना शदर पवारांनी चिमटा काढला होता.देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली होती. यावर आज उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पवार साहेब मोठे नेते आहेत त्यावर काही बोलायचे नाही. मला प्रथमच राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवून जाते. शिकत प्रगल्भता येत असते. महाराष्ट्रातील अनुभवाच्या आधारे बरेच निर्णय घेताना फायदा झाला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी प्रभारी म्हणून केलेल्या नेतृत्वामुळेच बिहारध्ये एनडीएचा विजय झाला असल्याचे मत राज्यातील भाजप नेत्यांनी मांडले.

Previous article“मेरे हार की चर्चा होगी जरूर…” जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचे कौतुक
Next articleपदवीधर-शिक्षक निवडणूकीत रंगत ; वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले उमेदवार