“मेरे हार की चर्चा होगी जरूर…” जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचे कौतुक

मुंबई नगरी टीम

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत एनडीएने बाजी मारली असली तरी खरे हिरो हे तेजस्वी यादवच ठरले असल्याले अनेकांचे म्हणणे आहे. याला महाराष्ट्रातील सत्ताधारी नेतेही अपवाद नसून त्यांच्याकडून तेजस्वी यादव यांचे कौतुक केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत तेजस्वी यादव यांनी निवडणुकीत विरोधकांना दिलेली झूंज ही कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.

“मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है, बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. अभिनंदन ! Well done”, अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काल निकालादरम्यान, तेजस्वी यादव यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली होती. तेजस्वी यादव यांची ही मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांचे कौतुक केले.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. सर्व २४३ जागांचे निकाल आले असून एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाआघाडीने ११० जागांवर विजय प्रस्थापित केला आहे.या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी महाआघाडीला पीछेहाट करावी लागली.मात्र राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी निवडणुकीदरम्यान उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. बिहारमधील तरुणाईने देखील त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला. तसेच महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनीही एकट्या नितीश कुमार यांनी एनडीएला कांटे की टक्कर दिली, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

Previous articleअन्वय नाईक कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा
Next articleभाजप शब्दांचे पक्के, देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला प्रत्युत्तर