पदवीधर-शिक्षक निवडणूकीत रंगत ; वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले उमेदवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात विधान परिषदेवरील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भाजप आणि काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत.यावेळी वंचितने औरंगाबाद,पुणे, नागरपूर या पदवीधर मतदार संघातील तीन उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.तर पुणे या शिक्षक मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतल्याने या निडणूकीत आता रंगत आली आहे.त्यानुसार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ यांना तर पुणे पदवीधर मतदारसंघ प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केले आहेत.नागपूर पदवीधर मतदारसंघातून राहुल महादेव वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.वंचितने पुणे शिक्षक मतदारसंघ प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे यांना संधी दिल्याने या निवडणूकीत चुरस निर्णाण झाली आहे.

दरम्यान, भाजपकडून नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसकडून नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासह पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे.विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी १ डिसेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर आहे. १३ नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होईल. तसेच १७ तारखेला उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील.

Previous articleभाजप शब्दांचे पक्के, देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला प्रत्युत्तर
Next articleवारकरी,कोळी बांधव,बॅण्ड पथकांचे राज ठाकरेंना साकडे; ठाकरेंनी दिला दिलासा