मुंबई नगरी टीम
मुंबई : शासन दरबारी समस्यांचे निराकरण होत नसून अनेक शिष्टमंडळ थेट कृष्णकुंजची वाट धरत आहेत. आज वारकरी संप्रदाय, कोळी बांधव आणि बॅण्ड पथकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. आगामी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आला होता.यावेळी राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.
कार्तिकी यात्रा समन्वय समितीचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. शिथिलतेच्या प्रक्रियेअंतर्गत आता बाजारापेठांसह सर्व गोष्टी खुल्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी कार्तिकी यात्रेवर शासनाने निर्बंध लादू नये. यासाठी संप्रदायाने स्वतः कार्तिकी यात्रा नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. यासंदर्भात संप्रदायाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. याला प्रतिसाद देत कार्तिकी यात्रा संदर्भात समन्वयाची भूमिका राज ठाकरे यांनी जाणून घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने जुन्या परंपरांवर अनेक निर्बंध ठेवत राज्य सरकारला सहकार्य केले होते. मात्र आता येणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी हे निर्बंध लादू नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाची आहे. तर ही भूमिका योग्य असून ती शासनपर्यंत पोहचवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
दरम्यान,वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळासह आज कोळी बांधव आणि बॅण्ड पथकांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील गावठाण कोळीवाडे शिष्टमंडळ आज कृष्णकुंजवर दाखल झाले होते. गावठाण जमीन मालकी मिळावी यासह अन्य मागण्या राज ठाकरेंपुढे शिष्टमंडळाने मांडल्या. तसेच मुंबई ठाणे ब्रास बॅण्ड वेलफेअर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेतली.बॅण्ड, घोडे,रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरू करण्याची मागणी बॅण्ड पथकांनी यावेळी केली आहे.