मुंबई नगरी टीम
जळगाव : भाजप उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या शाब्दिक चकमक रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले.प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले असल्याचे म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीकास्त्र डागले होते. त्याला खडसेंनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर ते स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत,असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले,माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्ष विरोधी काम करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ही जागा पाडण्यासाठी आतूनच पाठिंबा होता,या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच जनतेने आपल्याला सलग सहा वेळा निवडून दिले असल्याची आठवण करून देत, प्रसाद लाड यांनी जनतेतून एकदा तरी निवडून यावे, असे खुले आव्हान खडसेंनी दिले आहे.
एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपवर काही परिणाम होणार नाही. परिणाम होत नसेल तर भाजपचे पदाधिकारी वारंवार का असे म्हणतात? माझे नाव सारखे का घेत आहेत ? असे सवाल उपस्थित करत खडसेंनी पलटवार केला. प्रसाद लाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसेंना लक्ष्य केले होते. भाजप सोडल्यानंतर त्यांचा उलट प्रवास सुरू झाला आहे. स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे प्रसाद लाड यांनी म्हटले होते.