शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्रातील दौरा रद्द,खडसेंनी सांगितले ‘हे’ कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्रातील दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली होती. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांचेच लक्ष या दौऱ्याकडे लागले होते. मात्र हा दौरा काही कारणांमुळे रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे शरद पवार यांचा दौरा रद्द होण्यामागचे हे पाहिले कारण असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे शरद पवारांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. शरद पवार आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होईल यासाठी दौरा रद्द करण्यात आला, असे खडसे म्हणाले. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

शरद पवार आपल्या दौऱ्यादरम्यान धुळ्यासह नंदुरबारला जाणार होते. येथे ते स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. शरद पवार येणार या उत्सामुळे कार्यकर्त्यांनी तयारी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यताही होती. मात्र दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला. दरम्यान, येत्या काळात शरद पवारांचा दौरा पुन्हा आयोजित केला जाणार, असे सांगितले जात असून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Previous articleप्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे: खडसे
Next articleलोकं गायी म्हशीचा आवाज सहन करतील पण..; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर टीका