राज्यातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ का झाली ? महापौरांनी सांगितले ‘हे’ कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिवाळीनंतर राज्यातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून आता मुंबईलाही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. योग्य काळजी न घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दिवाळी निमित्त मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले होते. त्यातच पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारने सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खुप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, असे त्या म्हणाल्या. तसेच लोकल ट्रेन आणि शाळा सुरू करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच मुंबईत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळा सुरू झाल्या की ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मिडियावर पालकही शाळा न उघडण्याबाबत सहमत आहेत. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह लोकल ट्रेन सुरू झाल्यास कोरोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तूर्तास रेल्वे सुरू होऊ नये, असे मत महापाैरांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून आता मुंबईलाही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांना सावधान राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Previous article‘जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ : राज ठाकरे
Next articleफडणवीस उठाबशा काढत असले तरी,चितपट आम्हीच करू ;राष्ट्रवादीचे आव्हान