मुंबई नगरी टीम
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज तुम्हाला भाजपमध्ये दिसले असते, असा गौप्यस्फोट खासदार नारायण राणे यांनी केला होता.यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया देत राणे नेमके कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले ? असा प्रतिप्रश्न केला आहे. राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत,त्यामुळे ते नेमके कोणाबद्दल बोलले हे आपल्याला माहिती नाही, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी बारामती येथे सुप्रिया सुळेंनी मतदान केले.यावेळी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. नारायण राणे कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलत होते? महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटलांविषयी बोलले असतील असे मला वाटत नाही. मी स्वतः चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. त्यामुळे ते कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले माहिती नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सरकार पडण्याच्या विरोधकांच्या दाव्यालाही त्यांनी उत्तर दिले आहे. संघटना आणि कार्यकर्ते व्यवस्थित ठेवण्यासाठी विरोधकांना सरकार पडणार, असे बोलावे लागते, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सोमवारी पत्रकार परिषद घेत सत्ताधा-यांवर निशाणा साधला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज तुम्हाला भाजपमध्ये दिसले असते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जयंत पाटील यांची याबाबत चर्चाही झाली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. यावर स्वतः जयंत पाटील यांनी देखील खुलासा करत राणेंचा दावा खोडून काढला आहे. माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.