शरद पवारांनी घेतला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला.आज झालेल्या बैठकीत येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या नियोजनावर आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी यावर चर्चा झाली असल्याची माहिती अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील,दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे,आदी मंत्री उपस्थित होते.आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला असल्याचे समजते.तर या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी आणि येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मलिक यांनी बैठकीनंतर दिली.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार म्हणून एकत्र काम करत असताना मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्रच लढली जावी अशी आमची स्पष्ट भूमिका असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवली पाहिजे, अशी भूमिका घेतली असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

आजच्या बैठकीत राज्यभरात पक्षवाढीसाठी काय कार्यक्रम घ्यावयाचा,संघटना मजबूत कशी करायची यावर चर्चा करण्यात आली.पालकमंत्री, मंत्री यांच्या नेतृत्त्वात काय कामे झाली,याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.तसेच राष्ट्रवादी पक्ष आणखी कसा मजबूत होईल यावर चर्चा झाल्याचे मलिक यांनी सांगितले.या बैठकीत ग्रामपंचायत निवडणूकांबाबत कसलीही चर्चा करण्यात आली नसल्याचे मलिक यांनी सांगून औरंगाबाद, मिरा भाईंदर,नवी मुंबई, भंडारा जिल्हा परिषद, गोंदिया या निवडणूकांची तयारी कशी करायची याबाबत चर्चा झाली.औरंगाबाद नामांतर पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Previous articleराज्यात उद्या ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन
Next articleमुख्यमंत्र्यानी संपत्ती लपवली; भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार