धनंजय मुंडे प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या विषयावर भाष्य केले असून राजकारण्यांना एक सल्ला दिला आहे. खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडायच्या असतात.त्यामध्ये राजकारण आणायचे नसते.राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “काही गोष्टी खासगी असता काही कौटुंबिक असतात.त्या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. कुठल्या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर कायदे आणि ते पाहतील. यामध्ये कोणीही राजकीय भूमिका आणणे योग्य वाटत नाही. धनंजय मुंडेंचा हा व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रश्न आहे तो त्यांच्यावरच सोडला पाहिजे”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेची देखील आठवण करून दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काय नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सोडावे, असे ते म्हणाले. तसेच असे काही केल्याने महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येईल असे जर वाटत असेल तर, तो भ्रम आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी सदैव गोड राहावे

यावेळी संजय राऊत यांनी मकरसंक्रांतीनिमित्त विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. भाजपसोबत आम्ही २५ वर्षे फार जवळून काम केले आहे. आम्ही त्यांना त्या अर्थाने विरोधी पक्ष मानायला तयार नाही. राजकारणात जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचे सहकारी आहेत. या विरोधी पक्षातील सहकाऱ्यांनी गोड बोलावे, गोड राहावे, गोड हसावे, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा, सकारात्मक विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस यावेत अशी भूमिका घ्यावी, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या आहेत.

Previous articleनैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
Next articleधक्कादायक : मुंडेंवर आरोप करणा-या महिलेचे एकाच दिवसात तीन कारनामे उघड