धनंजय मुंडेंचा तूर्तास राजीनामा नाही,राष्ट्रवादीकडून वेट अँड वॉचची भूमिका

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत तूर्तास मुंडे यांचा राजीनामा न घेण्यावर एकमत झाले. त्यामुळे पक्षाकडून धंनजय मुंडे यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे. मात्र असे असले तरी या प्रकरणी पोलिसांकडून संपूर्ण तपास होईपर्यंत राष्ट्रवादीने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. तक्रारदार महिलेवर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,असे जयंत पाटील म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी सदर प्रकरणावर भाष्य केले. “धंनजय मुंडे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन संबंधित महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे त्यातून प्रतिबिंबित होत आहे. विशेषतः भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. असाच प्रकार त्यांच्याच बाबतीतही घडला. त्यामुळे या सर्वांची योग्य तपासणी होणे आवश्यक आहे”, असे जयंत पाटील म्हणाले. राजकारणात कार्यकर्ता घडण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कुणीही उठसुठ आरोप केले आणि तेच गृहीत धरून त्या माणसाच्या राजकारणाचा शेवट करायचा ही पद्धत अतिशय चुकीची आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या आरोपाची स्पष्टपणे चौकशी व्हावी. असे का घडले कशामुळे घडले याचाही खुलासा व्हावा.

धनंजय मुंडे यांच्याकडे जो फोन आहे, त्या फोनवर मुंडे यांना तक्रारदार महिलेने अनेक धमक्या दिलेल्या आहेत, त्याचाही तपास झाला पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, धनंजय मुंडे मागच्या काही वर्षांत कोणत्या त्रासात होते. कशा पद्धतीने त्यांचा छळवाद करण्याचे काम झाले याची माहिती पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे जबाबदार असतील, तरी त्याबाबतीत आम्हाला काही तक्रार नसल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. किंवा इतरांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडल्या असतील तर, याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले. पोलीस या सगळ्याचा योग्य तो तपास करतील याची मला खात्री आहे. तपासाच्या अंती जो काही निष्कर्ष असेल त्यानुसार पक्ष कारवाई करेल. शेवटी आमच्या पक्षाचा नेता, कार्यकर्ता जे काम करत आहे त्यात काही चूक असेल तर, आम्ही ती चूक लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करू, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी विशेषतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमच्या पक्षातील नेत्याला टार्गेट करू नये. आम्ही विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्नही करत नाही, असा टोलाही जयंत पाटील लगावला.

Previous articleधनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Next articleधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; महिला मोर्चाचे राज्यव्यापी आंदोलन