धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून तक्रारदार महिलेविरोधातच आता तक्रारी समोर येत आहेत.त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनाम्याचे संकट काहीसे दूर झाले आहे.या सगळ्या घडामोडीवर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला.मुंडे प्रकरणात घडलेल्या या नव्या घडामोडींवर राष्ट्रवादीची भूमिका काय यासंदर्भात शरद पवार यांनी भाष्य केले.यावेळी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयी देखील पवारांना विचारले असताना त्यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.

यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की,हा प्रश्न गंभीर असून आम्ही त्याची गंभीरपणे नोंद घेतली.या प्रकरणाची सगळी माहिती आम्ही घेतली.आमच्या प्रमुख सहकाऱ्यांशी यावर विचारविनिमय केला.महिलेने तक्रार केल्याने त्याची नोंद आम्ही गांभीर्याने घेतली ही तक्रार आल्यानंतर मिडियाच्या माध्यमातून एक एक नवीन गोष्टी आमच्यासमोर येऊ लागल्या. महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार पहिल्यांदा करण्यात आली. त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो.पंरतु असे असतानाच तक्रारदार महिलेबाबत नवीन माहिती समोर आली. तक्रारदार महिलेविरोधात एका व्यक्तीने त्याला ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या नेत्याच्याबाबत ती बातमी होती. अशा एकूण तीन व्यक्तींनी संबंधित महिलेबाबत अशीच तक्रार केली असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे,अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केले जात असल्यानेच ते कोर्टात गेले.याची माहिती त्यांनी आम्हाला दिलेली. हे प्रकरण सध्या कोर्टात असल्याने अधिक भाष्य करणार नाही असेही पवार म्हणाले.

मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का ? असा प्रश्न विचारण्यात आला.यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी सुरू असलेल्या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाला असल्याचे सांगण्यात येते.राजीनाम्याचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते.आरोप करणाऱ्याबाबतच एकापेक्षा एक अधिक गोष्टी समोर आल्यानंतर त्याची सत्यता समोर आली पाहिजे.अन्यथा कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा अशी प्रथा पडू शकते,याचे गांभीर्यही पवारांनी लक्षात आणुन दिले.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.दरम्यान,गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. मुंडे यांच्या प्रकरणावर बैठकीत चर्चा झाली असून त्यांचा राजीनामा तूर्तास न घेण्याचा निर्णय झाला,अशी माहिती आहे.

…म्हणून मी गंभीर शब्द वापरला

या प्रकरणावर काल पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार हे मुंडेंवर कारवाई करणार असल्याचे संकेत होते. यावरून भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागले असून आपल्या विधानाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्र समोर नव्हते.एखाद्या भगिनीने तक्रार केली म्हटल्यावर तिची दखल घेतली.त्यामुळे गंभीर असा शब्द वापरला.मात्र आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असे वाटते,असे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी महिला एसीपीने करावी, अशी सूचनाही केली. पोलिसांच्या चौकशीत आम्ही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी.आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईपर्यंत थांबावे लागले.त्यानंतर निर्णय घेऊ.तसेच सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल, असेही शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Previous articleधक्कादायक : मुंडेंवर आरोप करणा-या महिलेचे एकाच दिवसात तीन कारनामे उघड
Next articleधनंजय मुंडेंचा तूर्तास राजीनामा नाही,राष्ट्रवादीकडून वेट अँड वॉचची भूमिका