विरोधकांना संयमाची लस टोचण्याची गरज – मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज भीषण आग लागली असून त्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला. इन्स्टिट्यूटला लागलेली आग नियंत्रण आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवरून घातपाताची शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे या आगीवरून आता राजकारण करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीच्या व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरूनही भाजपला चिमटा काढला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीविषयी माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार कोरोनाची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस जिथे तयार केली जाते तिथे आग लागली होती. आग नियंत्रणात आली असून ६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणांकडून ही माहिती घेतलेली आहे. सर्व शांत झाल्यानंतर मी सर्वांशी संवाद साधून अधिकची माहिती घेईन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आगीवरून घातपाताची शक्यता विरोधकांनी वर्तवली असून राजकारण केले जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,अशी माहिती त्यांच्याकडे नेमकी कशी येते ? मग ते सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा आणखी काही असेल.ही माहिती त्यांच्याकडे कशी येते हे गुपित आहे. त्यांचे ज्ञान हे अघाध आहे,त्यांना काहीतरी विद्या वैगरे प्राप्त असेल. माहिती असेल तर त्यांनी जरुर द्यावी. त्यांना संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असे शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी सर्वपक्षीय खासदारांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. या बैठकीत खासदारांनी त्यांच्या समस्या मांडल्या. खासदारांनी जे प्रश्न मांडले त्यानुसार विभागावर समित्या बनवणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतरही खासदारांची बैठक घेतली जाणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सर्व खासदारांनी पंतप्रधानांना भेटले पाहिजे. आरक्षण विषयावर केंद्राची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधानांची भेट घ्या, आशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleतर तुमच्यावर संगनमताचा आरोप होईल; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Next articleधनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्मांनी बलात्काराची तक्रार मागे घेतली