मुंबई नगरी टीम
- निर्बंधांवर विरोधकांनी आक्षेप घेतला
- मोघलाई सरकार अस्तित्वात असल्याचा भास
- मराठा क्रांती मोर्च्याची सेनाभवनासमोर बॅनरबाजी
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात एकही सण मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करता आला नाही.यंदाच्या वर्षीही कोरोनाचे सावट काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे १९ फेब्रुवारीला शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.राज्य सरकारकडून लादलेल्या निर्बंधांवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.केवळ शिवजयंतीलाच अशी बंधने का आठवली ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
यंदा शिवजयंतीचा उत्सव सध्या पध्दतीने साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे. यावरून प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले.”ज्यांनी शिवरायांच्या नावावर आजवर स्वतःची राजकीय पोळी भाजली,तेच लोकं आज शिवनेरीसह महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यास बंधने घालत आहेत. मान्य आहे कोरोनामुळे ही बंधने लादली असावीत.परंतु केवळ अशी बंधने शिवजयंतीलाच का आठवली ?”, असे ट्विट दरेकर यांनी केले.यावर अधिक बोलताना ते म्हणाले की, “इतर वेळी मूग गिळून गप्प बसणारे, हे आघाडी सरकार नसून महाराष्ट्रात मोघलाई सरकार अस्तित्वात असल्याचा यामुळे भास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंतीसाजरी करण्यास मज्जाव करणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध”.
मराठा क्रांती मोर्च्याची सेनाभवनासमोर बॅनरबाजी
राज्य सरकारने शिवजयंती उत्सवावर घातलेल्या निर्बंधांमुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.मराठा क्रांती मोर्च्याकडून आज शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करून निषेध करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला झालेली गर्दी, शरद पवारांचा वाढदिवस, राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा यावेळी झालेल्या गर्दीमुळे करोना होत नाही का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून हा बॅनर काहीवेळातच उतरवण्यात आला.
शिवजयंतीवरील निर्बंध
सुरुवातीला राज्य सरकारने केवळ १० लोकांच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली होती. मात्र विरोधकांनी टीकेचा भडिमार केल्यानंतर सरकारने माघार घेत शिवजयंतीला १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली. मात्र असे असले तरी १८ आणि १९फेब्रुवारीला प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास मनाई आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे गृह विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.