बिग बी अमिताभ बच्चन,अक्षयकुमारचे शूटींग व चित्रपट बंद पाडू! काँग्रेसचा इशारा

मुंबई नगरी टीम

  • दरवाढ झाली असतानाही सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसलेत
  • शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत
  • मोदी सरकारची तळी उचलण्याचे काम केले

मुंबई । मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आज पेट्रोल १०० रुपये लिटर तर घरगुती गॅस सिलेंडर ८०० रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकारविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन,अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती.मात्र आज युपीए सरकारवेळी असलेल्या दरापेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू,असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडाऱ्यात आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळेच अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधातही आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रिटींनी पाठिंबा देताच या सेलिब्रिटींना ट्विट करून मोदी सरकारची तळी उचलण्याचे काम केले. ८५ दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करत आहे. भारतीय जनता पार्टी, भाजपाचा आयटी सेल यांनी या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, दहशतवादी म्हणून बदनाम केले त्यावेळीही या सेलिब्रिटींनी मौन पाळले. परंतु भाजपाच्या आयटी सेलच्या सांगण्यावरून त्यांनी शेतकरीविरोधी ट्विट केले. हे सेलिब्रिटी भाजपाच्या आयटी सेलचे पोपट आहेत का? असा सवालही पटोले यांनी विचारला आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘सबके साथ, “विश्वासघात”
Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशन : ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार