MPSC ची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत; विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.यासंदर्भात मुख्य सचिव तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे  म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ काही दिवसांसाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थी ज्या ठिकाणी परीक्षा देणार आहेत ती परीक्षा स्थळे, परीक्षा घेणारा कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे का हे पाहणे आवश्यक आहे. जे कर्मचारी पेपर वाटणार, पर्यवेक्षण करणार किंवा परीक्षा घेणार त्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाली आहे का, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे का , त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक हित लक्षात घेऊन पहाणे महत्वाचे आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या युवकांच्या करिअरचा विषय युवकांप्रमाणे  शासनासाठी ही तेवढाच महत्वाचा आहे त्यामुळे रस्त्यावर उतरू नका तुमचे करिअर आणि तुमची आरोग्य विषयक सुरक्षितता आमच्या सर्वांसाठीच महत्वाची आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच विद्यार्थ्यांना कोरानाच्या दडपणाखाली येऊन परीक्षा द्यावी लागू नये हीच प्रामाणिक इच्छा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्‍ट केले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही संभ्रमात न राहाता, भ्रामक विचारांना बळी न पडता संयम बाळगण्यास सांगितले तर विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळू नका असे मुख्यमंत्र्यांनी  विरोधकांनाही आवाहन केले.

काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड खाली गेलेली असतांना आता मागील काही दिवसांपासून ती पुन्हा झपाट्याने १२ ते १३ हजार प्रति दिन अशी वाढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु आहे. शासकीय, आरोग्य कर्मचारी कोरोना नियंत्रण, काँटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचाराच्या कामात गुंतत आहे. आज ही नागरिक कोरोना चाचणी करून घ्यायला घाबरत आहेत. पण तसे न करता नागरिकांनी पुढे येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज बाधित होणाऱ्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन होण्यास परवानगी दिली तर ते मला काहीच होत नाही असे वाटून बाहेर फिरतांना दिसत आहेत, त्यामुळे कुटुंब च्या कुटुंब बाधित होतांना दिसत आहेत. त्यांना काही होत नाही पण घरातलीच एखादी व्यक्ती त्यामुळे गंभीर झाली तर काय करणार असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारले

कोरानाची ही लाट वाढू नये, शिखर पातळीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा आज तरी उपलब्ध आहे, त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावेच लागेल, लस घेतली तरी ही त्रिसुत्री पाळावी लागेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असतांना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच  आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडॉऊन लावण्याच्या सुचना आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.दुसऱ्या लाटेचा जगभरातील अनुभव फार वाईट आहे, ब्राझीलसारख्या देशात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे,  तिकडे हाहाकार झाला आहे.  तिथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. ती परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात अजिबात येऊ द्यायची नाही,  आपल्याकडे पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचं नाही, त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, त्रिसुत्रीचे पालन  करून शासनाला सहकार्य करावे  असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleMPSC EXAM : नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा,मार्ग काढण्याचे दिले आश्वासन
Next articleलस घेतानाही रामदास आठवले यांनी केली ‘भन्नाट’ कविता वाचा काय म्हणाले आठवले !