गृहमंत्र्यांना अडचणीत आणणा-या ‘त्या’ पत्राबाबत परमबीर सिंह यांनी केला मोठा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर,या पत्रात परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिले असून त्यावर स्वाक्षरी नसल्याने या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे,असा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्यानंतर या प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच या पत्राबाबत परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पत्र लिहिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आज पुन्हा परमबीर सिंग यांनी या पत्राबाबत महत्वपूर्ण दावा केला आहे.गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले होते.या प्रकारामुळे परमबीर सिंह यांच्या पत्रावर शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र परमबीर सिंह यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या संदर्भात परमबीर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र मीच लिहले आहे.तसेच लवकरच स्वाक्षरी असलेल्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असेही त्यांनी सांगून,काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण सर्व नमूद केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleराज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न,अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय
Next articleमुख्यमंत्रीच वाझेचे गॉडफादर,मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : राणेंची मागणी