पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भगीरथ भालके विरूद्ध समाधान औताडे सामना रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असून,भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत भगीरथ भालके विरूद्ध समाधान औताडे असा सामना रंगणार आहे.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर राष्ट्रवादीने आज आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पाटील यांनी केली आहे.शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. ते नक्कीच विजयी होतील,असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी येथून बंडखोरी केली आहे.मुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने त्या आपली उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा आहे.त्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजपचे समाधान औताडे विरूद्ध महाविकास आघाडीचे भगीरथ भालके अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.या पोटनिवडणूकीसाठी येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून, निकाल २ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.३० मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

Previous article‘पिंगा फेम’ गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Next articleशरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल;आजच शस्त्रक्रिया करणार ?