अखेर अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई । गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआमार्फत करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाचा कार्यभार हा मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे.देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील राजीनामा देणारे ते दुसरे मंत्री ठरले आहेत.

सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला होता.देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांची एक सदस्य समिती गठीत केली आहे.परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते.यासंदर्भात अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.उच्च न्यायालायाने अॅड पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआयला आदेश देत १५ दिवसांची मुदत दिली आहे. देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग येवून अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत देशमुखांनी पवारांकडे मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावर पवारांनी होकार दिला.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.राजीनामा देणारे अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमधील दुसरे मंत्री ठरले आहे.यापुर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे सध्या मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे.नव्या गृहमंत्र्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील, असेही मलिक म्हणाले.

Previous articleBreaking वाचा : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत काय सुरू,काय बंद राहणार
Next articleराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले महत्वाचे आवाहन