राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले महत्वाचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना महामारीने गंभीर रुप घेतले असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केले.

कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे.दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे.राज्यशासन,पोलिस व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स,परिचारिका व संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एका पत्राद्वारे आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी ट्विट करीत राज्यातील जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. जनतेने राज्यशासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सूचना कसोशीने पाळाव्यात. सभासमारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम टाळावेत असेही शरद पवार म्हणाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा. त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्याप्रमाणावर निर्माण झाला आहे. त्याकरिता रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन हिरिरीने भाग घ्यावा. आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर या महामारीवर निश्चित मात करु,असा विश्वासही पवार यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

Previous articleअखेर अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा
Next articleगृहमंत्र्याचा राजीनामा हे राज्य सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण