ब्रुक फार्मा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बालीश राजकारण थांबवावे

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील जनतेसाठी ५ हजार रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे,याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही आ.लाड यांनी सांगितले.

आ.लाड म्हणाले की,राज्यातील कोरोना संदर्भातील सोयी सुविधांची बिकट परिस्थिती पाहता ‘भाजपा’ने सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून राज्य सरकारला ५० हजार रेमडिसिवरऔषधांचा पुरवठा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.भाजपाकडून रेमडिसिवर चा हा साठा राज्य सरकारकडे सुपूर्त केला जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. यासाठी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मी दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीला भेट देऊन त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांच्याशीही संपर्क साधुन त्यांना माहिती दिली.अन्न व औषध प्रशासनाने तशी परवनागीही दिली.दमणच्या औषध प्रशासनाकडूनही परवनागी मिळाली होती. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही याची माहिती दिली होती. मात्र या उपक्रमाचे श्रेय भाजपाला मिळू नये या संकुचित वृत्तीमुळे महाविकास सरकारकडुन शेवटच्या क्षणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देऊन चौकशीसाठी बोलवले गेले.

लाड म्हणाले की, अलीकडेच राज्य सरकारकडून ११ कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली गेली. यामध्ये ब्रुक फार्मा या कंपनीचेसुद्धा नाव आहे. या कंपनीकडे ६० हजार औषधांच्या कुप्यांचा साठा असल्याचा आरोप पोलिसांकडून केला गेला होता. मात्र ४८ तास उलटले हा साठा कुठे आहे या प्रश्नावर मात्र हे सरकार निरूत्तर झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे किंवा थेट फडणवीस यांच्याकडुन कोणतीही माहिती न घेता, विषय जाणून न घेता थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षीत होते.सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही घाबरत नाही. जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील असे ते म्हणाले.राज्यात रेमडिसीवर औषधांसाठी रूग्णांची फरफट होत आहे. सरकारने सद्यस्थितीचे भान राखावे, राजकारण बाजुला ठेवावे व जनतेच्या हितासाठी जे योग्य आहे त्यासाठी विरोधकांकडे जर चांगल्या योजना असतील तर त्याची माहिती घेऊन एकत्रितरीत्या काम करावे आणि राज्याला या संकटाला बाहेर काढावे असे ही ते म्हणाले.

Previous articleतर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या : प्रविण दरेकरांचे सरकारला खुले आव्हान
Next articleनवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा;चंद्रकांत पाटील यांची राज्यपालांकडे मागणी