“ताऊक्ते” चक्रीवादळ : सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई नगरी टीम

मुंबई : “ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अलिबाग-६०५,पेण-१९३,मुरुड-१०६७,पनवेल१६८,उरण-४५१,कर्जत-४५,खालापूर-१६७,माणगाव-१३०९,रोहा-५२३,सुधागड-१६५,तळा-१३५,महाड-१०८०,पोलादपूर-२९३,म्हसळा-४९६,श्रीवर्धन- ११५८या एकूण ७ हजार ८६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

Previous articleमराठा आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा; भाजपाची समिती स्थापन
Next articleसंपूर्ण देश एकजूट,किती लोकांना अटक करताय बघुया..नवाब मलिक यांचे भाजपला आव्हान