त्यांची भूमिका त्यांनी बघावी,मी काय भाजपाचा ठेका घेतलेला नाही : छ. संभाजीराजेंचा घरचा आहेर

मुंबई नगरी टीम

नाशिक । मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण असून,त्यासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र फिरुन आरक्षणाबाबत भावना समजून घेणार आहे.मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे.त्यानंतरच मी माझी भूमिका मांडणार असे स्पष्ट करतानाच,यानंतर आमदार आणि खासदारांनी माझं तुझं केलं तर बघा असा इशारा देत मी काही भाजपाचा ठेका घेतलेला नाही,अशा शब्दांत त्यांनी भाजपला आरक्षणावरून घरचा आहेर दिला आहे.

भाजपाचे राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे आज नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या २७ तारखेला मराठा आरक्षणावर माझी भूमिका मांडणार असून त्यानंतर कोणी माझं तुझं केलं तर बघा असा इशारा त्यांनी आमदार आणि खासदारांना दिला आहे.मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यावर बोला असे आवाहन करत मी काही भाजपाचा ठेका घेतलेला नाही असा घरचा आहेर त्यांनी भाजपला दिला आहे.मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे.या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा देत एका समितीची स्थापना केली आहे.याबाबत संभाजीराजे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की,“त्यांची भूमिका त्यांनी बघावी. मी काय त्यासाठी ठेका घेतलेला नाही.आरक्षणावर तोडगा काय निघतो आणि मराठा समजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यासंबंधी बोला असे त्यांनी सुनावले.गेल्या सरकारने बोगस कायदा केला की आताच्या सरकारने योग्य मांडणी केली नाही याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जास्त अभ्यास असलेले अनेकजण असून,त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे.त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून भावना समजून घेणार आहे.तसेच येत्या २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहे. यावंतरच मी माझी भूमिका मांडणार आहे.मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.मी अजून शांत आहे. आक्रमक झालेलो नाही, मात्र त्यासाठी दोन मिनिटे लागतात असे सांगून,मराठा समाज काय करणार हे येत्या २७ तारखेला सर्वांना कळेल असा सुचक इशारा त्यांनी देत,पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावे. आपला जीव धोक्यात घालू नका असे आवाहन त्यांनी केले.मी समंजसपणाने भूमिका घेतली होती,त्याच्यावर काहींनी शंका घेतली.माणसं जगली तर आरक्षणासाठी लढू शकतो.छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसे करायचे हे शिकवण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

मी छत्रपती शिवाजी महाजारांची,राजर्षी शाहू महाराजांची आणि समाजाची भूमिका मांडत असतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर गेल्या काही दिवसात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत.मराठा समाजाला याच्याशी काही देणे घेणे नाही,तुम्ही काय मार्ग काढणार आहात ते सांगा, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी चार वेळेला पत्र दिले.मात्र अजून त्यांनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही.तरीही मी पुन्हा एकदा मुद्दा मांडेन.समाजासाठी मी कुठेही आवाज उठवण्यास तयार आहे असे सांगून, मी कोणाला घाबरत नाही असे त्यांनी ठणकावले.

Previous articleरिक्षा चालकांनो..शनिवारी खात्यात १५०० रुपये जमा होणार,लायसन आणि आधारची नोंदणी करा
Next articleमराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहेत !