मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहेत !

मुंबई नगरी टीम

मुंबई । ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत असून,कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवणे हे राजकारण त्यांनी बंद करावे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे तशी भूमिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही मलिक यांनी दिला आहे. फडणवीस हे वकील आहेत.त्यामुळे वकीलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ यापध्दतीने बोलता येते असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल दिला आहे. संसदेत केंद्राने राज्याचा अधिकार अबाधित राहिल असे स्पष्ट केले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर फेरविचार याचिका केंद्राने दाखल केली आहे. मात्र ती महाराष्ट्रासाठी नाही तर सर्व राज्ये तुटून पडणार म्हणून दाखल केल्याचे मलिक म्हणाले. मराठा आरक्षणाचा कायदा कायद्याच्या चौकटीत राहून केला असल्याचे फडणवीस सांगत आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकारच नाही सांगितले आहे राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठीच केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे असेही मलिक म्हणाले.

सुरुवातीपासूनच आरक्षण देण्यात आले तेव्हापासून ओबीसींचा कोटा अबाधित ठेवून अतिरिक्त आरक्षण देण्याचा पहिल्यांदा निर्णय झाला होता आणि महाविकास आघाडी सरकारने जो कायदा मंजूर केला त्यामध्येही एकमताने हा प्रस्ताव आहे. अजून यापुढेही राज्य सरकारची भूमिका तीच राहणार आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले.आता आमची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे. याच्यावर एकमत असताना त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. भाष्य करुन काय संदेश देऊ इच्छित आहेत. समाजासमाजात भेद निर्माण करण्यासाठी बोलत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

Previous articleत्यांची भूमिका त्यांनी बघावी,मी काय भाजपाचा ठेका घेतलेला नाही : छ. संभाजीराजेंचा घरचा आहेर
Next articleकोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण ? मोदींना ९० टक्के मतं