आ.निलेश लंके शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून शोभतात :जयंत पाटलांनी केले कौतुक

मुंबई नगरी टीम

अहमदनगर । आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले.शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात असे सांगतानाच जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवार सामान्यांसाठी धावून जातात त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निलेश लंके यांचे कौतुक केले आहे.

पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले असून त्याठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान आमदार निलेश लंके यांनी मंत्री जयंत पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार निलेश लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात मंत्री जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने आमदार निलेश लंके भावूक झाले होते.

काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो मात्र आज भेट दिल्याने आमदार निलेश लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपासून झोकून काम करत आहे, लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Previous articleपंतप्रधान मोदी खरंच भावूक झाले होते की ठरवून कार्यक्रम केला होता ? राष्ट्रवादीचा सवाल
Next articleमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मी केवळ निमित्तमात्र,माझी टीम मजबूत व कुशल”