राज्यात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू ! पोलिस आयुक्तांना निलंबित करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

ठाण्यातल्या आम्रपाली,नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले.त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की,कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत.माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत. असे असताना दुसरीकडे डान्स बारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरू आहेत. गृहमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली असली तरी तात्पुरती आणि तुंटपुजी कारवाई केली गेली आहे. गृहमंत्री यांनी पोलिस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे,अशी मागणी दरेकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

दरेकर म्हणाले की, एखादी घटना घडली की मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. बार चालू केल्याप्रकरणी ज्याचा ज्याचा संबध आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कारवाई करून जे असे कृत्य करतात त्यांना कायमची चपराक बसेल तर पुढे असे कृत्य करताना विचार केला जाईल त्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.सरकार कोरोनाची भीती दाखवत सर्वसामान्यांना निर्बंध घालत आहेत. सामान्यांना गर्दी करू नका, असे ओरडून सांगायचे तर दुसऱ्या बाजूला डान्स बार चालू ठेवून गर्दी करत धिंगाणा घालायचा.धिंगाणा घालण्याकरता परवानगी दिली जाते ही दुर्दैवाची बाब आहे.यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Previous articleमंत्रिमंडळातील दोन रिक्त जागा भरणार,नाना पटोलेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार ?
Next articleअजितदादांचा वाढदिवस : सुप्रियाताई सुळे देणार छत्र हरपलेल्या बालकांना मायेचा आधार