मुंबई नगरी टीम
मुंबई । १९५८ मध्ये शरद पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॅालेज मध्ये प्रवेश घेतला.शिक्षणासोबतच त्यांची ‘काँग्रेस’च्या कामातील गोडी वाढत होती.त्यामुळे शरद पवार यांच्यात काँग्रेस रूजू लागली आणि त्यांना पुण्यातील काँग्रेस भवनाचं वातावरण कौटुंबिक वाटू लागले. अशातच त्यांच्यावर पुणे शहर युवक काँग्रेसच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.मात्र पवार यांच्यावर काँग्रेसवरच्या निष्ठेची कसोटी पाहणारा काळ १९६० च्या सुमारास आला आणि त्यांनी यामध्ये बाजी मारली.
शरद पवार शिक्षणासाठी पुण्यात १९५८ साली दाखल झाले आणि येथेच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली.शिक्षणासोबतच काँग्रेसच्या कामातील त्यांची गोडी दिवसेंदिवस वाढत होती.त्यामुळे काँग्रेस भवनातील त्यांच्या फेरा वाढत चालल्या होत्या.पुण्याचे प्रथम महापौर बाबूराव सणस यांच्या घरी अनेक बड्या नेत्यांशी संवाद साधण्याची संधी त्याकाळी पवार यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यात काँग्रेस रूजू लागली.अशा काळातच पवार यांच्यावर पुणे शहर युवक काँग्रेसच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.मात्र १९६० साली त्यांच्यावर काँग्रेसवरच्या निष्ठेची कसोटी पाहणारा क्षण आला.१९५७ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले केशवराव जेधे यांचे निधन झाल्याने या ठिकाणची पोटनिवडणूक जाहीर झाली होती.या निवडणुकीत काँग्रेसने केशवराव जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना उमेदवारी जाहीर केली होती.तर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून शरद पवार यांचे थोरले बंधू अॅड.वसंतराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता.पवार यांचे कुटुंब संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम करीत होते.त्यामुळे पुणे शहर युवक काँग्रेसच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी असलेले शरद पवार काय भूमिका घेतात याकडे त्यांच्या कुटुंबाचे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते.
शरद पवार हे काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्ता असल्याने त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारले होते.बारामतीची पोटनिवडणुक यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती.एस.एम देशमुख,आचार्य अत्रे,उद्धवराव पाटील आदी नेत्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने रान पेटवलं होतं.पक्ष की कुटुंब अशी जेव्हा कसोटी पाहणारा क्षण आला तेव्हा शरद पवार यांनी त्यांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांना प्रामाणिक आणि स्पष्टपणे सांगितले की,मी काँग्रेसचे काम करणार, वसंतराव पवार यांनीही तेवढ्याच सहजपणे आणि मोठ्या मनाने शरद पवार यांची भूमिका मान्य केली.वसंतराव पवार हे त्यांचे आधारस्तंभ होते.सर्व भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अपार मेहमत घेतली होती.पवार कुटुंबातील ते पहिलेच कायद्याचे पदवीधर असल्याने त्यांच्याबद्दल खूप अभिमान आणि आदर होता.त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचार कसा करायचा याचं भावनिक दडपण त्यावेळी पवार यांच्यावर होते.त्यावेळी वसंतराव पवार यांनी शरद पवार यांचे केवळ म्हणणेच ऐकले नाही तर ” तू काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहेस.तर काम त्याच पक्षाचं आणि त्यांच्याच उमेदरावाचे केले पाहिजेस असे सांगितले.
बारामती लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक ही संयुक्त महाराष्ट्रानंतरची पहिली निवडणूक होती.यापूर्वीच्या १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.त्यामुळे दिल्लीच्या नेत्यांचे या पोटनिवडणूकीवर बारीक लक्ष होते.अशातच शरद पवार यांच्या मातोश्री यांनी पवार यांना बळ दिले,तुझ्या विचारात स्पष्टता आहे,याचा मला आनंद आहे.त्यामुळे तु प्रमाणिकपणाने काँग्रेसचेच काम केले पाहिजे असे सांगितले.त्यामुळे पवार यांना कुटुंब का पक्ष असा निर्णय घेताना मनात घालमेल झाली नाही.या निवडणूकीत पवार यांनी मनाची कोंडी न होवू देता मनापासून काँग्रेसचा प्रचार केला.रात्रदिवस स्वत:ला पक्षाच्या कार्यात वाहून घेतले.पक्षाबद्दल असणारी तळमळ पाहून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मनात पवार यांच्याबद्दल कौतुकाची भावना तयार झाली.सख्या मोठ्या भावाच्या विरोधात काम केल्याने पवार हे विचाराने पक्के असल्याची खात्री वरिष्ठांना त्यावेळी पटली होती.या निवडणुकीत शरद पवार यांचे थोरले बंधू संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार वसंतराव पवार यांचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाचा विजय झाला.१९५७ च्या झालेल्या मोठ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील विजयात पक्षाचे यश उठून दिसले त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांना पवार यांच्याबद्दल अधिक ममत्व वाटू लागले.या संपूर्ण घटनेचा उल्लेख लोक माझ्या सांगाती..राजकीय आत्मकथा यामध्ये करण्यात आला आहे.