मार्डच्या मागण्यांवर त्वरित योग्य तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा येथे भेट घेतली.यावेळी सकारात्मक चर्चा होऊन मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की,या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल.वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पाऊले उचलावी असे सांगितले.त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्धल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पाऊले उचलेल असा विश्वास व्यक्त केला.

Previous articleसुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया
Next articleअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची धनंजय मुंडेंची मागणी