अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई नगरी टीम

बीड । बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे,नदीचे पात्र बदलून शेतात शिरले,अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली,याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे हे आज अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा,केज तालुक्यातील उंदरी,अरणगाव आदी गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नदी काठच्या शेतांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून लवकरच या सर्व नुकसानीची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे तसेच आरंबगाव येथील बालाजी सिरसाट यांचे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी निधन झाले होते.आज पालकमंत्री मुंडे यांनी या तीनही कुटुंबियांची भेट घेऊन सोनवणे व सिरसाट परिवारांचे सांत्वन केले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने तीनही कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदतीचा धनादेश मुंडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.या तीनही कुटुंबातील नातेवाईकांशी धनंजय मुंडे यांनी चर्चा करत त्यांच्या भविष्यातील निर्वाह,घरांची पडझड दुरुस्ती तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचाही शब्द दिला आहे.

Previous articleमार्डच्या मागण्यांवर त्वरित योग्य तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleनवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी; गरबा,दांडिया खेळण्यास बंदी