मोठी बातमी । सरकारी कार्यालयातील हजेरी संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढती करोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीसह राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक पध्दतीने घेतली जाणारी हजेरी बंद करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

३१ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आली आहे. मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीत बायोमेट्रीक हजेरीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता प्रत्येक मजल्यावर नव्याने बायोमेट्रीक मशिन्स बसविण्याची सूचना करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने घेतली जाते. या पध्दतीमुळे करोनाचा रोगप्रसार अधिक धोका असल्याने ही पध्दत बंद करण्याची मागणी केली जात होती.अखेर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील निर्णय जाहीर करत येत्या ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक प्रणाली स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मंत्रालयात व नवीन प्रशासकीय इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रीक मशीन्स पुरेशी प्रमाणात नसल्याचे आढळून आले होते.परिणामी उपस्थिती नोंदविताना मोठ्या प्रमाणात गर्दी आणि गोंधळ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता मंत्रालयाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रीक मशिन्स बसविण्याचे आदेश माहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्यात आले आहेत.

Previous articleनिर्बंध कडक करा,पण लॉकडाऊन नको ! …भाजपची भूमिका
Next articleराज्यात लॅाकडाऊन करणार नाही मात्र कठोर निर्बंध लागणार