माझ्यावरील कारवाई हा महाविकास आघाडी सरकारचा ‘डीसायडेड प्रोग्राम’

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई बँकेच्या विरोधातील आर्थिक गुन्हे विभागाने दाखल केलेला गुन्हा यापूर्वीच ‘सी’ समरी झाला असताना केवळ राजकीय द्वेषभावनेतून तो परत खुला केला गेला.ज्या मजूर संस्थांचा सभासद म्हणून मी आधीच त्या मतदारसंघातून राजीनामा दिला असल्यामुळे तो विषयही संपलेला आहे. परंतु, विविध मार्गाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा प्रयत्न केला गेला असून मी याबाबत न्यायालयात कायदेशीररित्या दाद मागणार आहे. माझ्याविरोधात चुकीचा गुन्हा दाखल झाला आहे हे आम्ही न्यायालयात कायदेशीरमार्गाने निश्चितच सिध्द करु असा विश्वास व्यक्त करतानाच माझ्या विरोधातील कारवाई हा महाविकास आघाडी सरकारचा ठरलेला कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

याबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितले की,महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या कर्मामुळे त्यांच्यावर सध्या ज्या कायदेशीर कारवाया सुरु आहेत, त्यामुळे हे सरकार सध्या बेजार झाले आहे.त्यामुळेच भाजपाच्या नेत्यांच्याविरोधात चिखलफेक करायची आणि दबाव आणायचा हा या सरकारचा ठरलेला कार्यक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचे षड्यंत्र उघड केले म्हणूनच, महाविकास आघाडी सरकार हे बदला घेण्याचे राजकारण करत आहे.मात्र, आम्हाला याची चिंता नाही.आपल्याकडे जी न्यायव्यवस्था आहे त्यांच्याकडे न्याय मागू,चुकीचा गुन्हा कसा नोंदविण्यात आला ते न्यायायलात सिध्द करु. राज्यात सुमारे वीस ते पंचवीस हजार मजूर संस्था आहेत.या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,खासदार आणि आमदार आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मजूर संस्थांचा प्रतिनिधी निवडून जातो.मग त्या सुमारे पंचवीस हजारांवर गुन्हे दाखल करणार का ? असा सवाल करतानाच,माजी मंत्री गुलाबराव देवकर फेडरेशनचे अध्यक्ष होते.त्यांचीही मजूर संस्था होती.या अनुषंगाने राज्यातील मजूर संस्थांचा अस्तित्वाचा प्रश्न या सरकारने उपस्थित केला आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

भाजपाला लक्ष्य करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करते आहे, मात्र त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे.म्हणून काऊंटर करण्याचे काम ते करत आहेत. मात्र, अशा दबावाला आम्ही घाबरत नाही. आम्ही न्यायालयाकडे न्याय मागू. आम्ही दबावाला घाबरणार नाही. तपशीलवार उत्तर देऊ. कायदेशीररित्या न्याय मागू असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

Previous articleप्रविण देरकर यांच्यावरील गुन्ह्याचे सभागृहात पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज ठप्प
Next articleभगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत तर ‘भाजप’पाल झालेत ; नाना पटोलेंचा प्रहार