प्रविण देरकर यांच्यावरील गुन्ह्याचे सभागृहात पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज ठप्प

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचे विधानपरिषदेच्या सभागृहात तीव्र पडसाद उमटले. दरेकर यांच्यावरील आरोप खोटे असून,हा विरोधकांवर अन्याय आहे असा आरोप विरोधकांनी करीत अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो,विरोधकांचा आवाज बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.तर सत्ताधारी सदस्य अटक करा,अटक करा अशा प्रतिघोषणा देत होते.दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ घातल्यामुळे प्रथम दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास प्रश्नोत्तराचा तास पुकारताच भाजपचे सदस्य भाई गिरकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे दरेकर यांच्याविरोधात आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप भाई गिरकर यांनी केला. सरकारने अशा पद्धतीने सुडाचे राजकारण करणे योग्य नाही असे ते म्हणाले. त्यानंतर विरोधकांनी सभापतीच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.विरोधी पक्षनेत्यावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या निषेध असो अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी २५ मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पुन्हा सभागृह साडेबारा वाजता सुरु झाले. पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारले. तेव्हा भाजपचे सदस्य प्रसाद लाड म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यावर चुकीची कारवाई करण्यात आली आहे. दरेकर हे सरकारच्या घोटाळ्याची प्रकरणे बाहेर काढत आहेत. ही कारवाई चुकीची असून, मी त्याचा निषेध करतो असे लाड म्हणाले.लाड यांच्या म्हणण्यास भाजपचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी दुजोरा दिला. त्यावेळीस सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी भाजप सदस्यांच्या म्हणण्यास आक्षेप घेऊन दरेकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी केली. तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी २० मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केली.

पुन्हा तिसऱ्यांदा सभागृह सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी दरेकर यांच्या अटकेची जोरदार मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्य उभे राहून अटक करा, अटक करा अशा घोषणा देऊन लागले. विरोधकही सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले. या गोंधळातच कामकाजपत्रिकेवरील उर्वरित कामकाज पुकारुन सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याचे सभापती निंबाळकर यांनी जाहीर केले.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे;गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा
Next articleमाझ्यावरील कारवाई हा महाविकास आघाडी सरकारचा ‘डीसायडेड प्रोग्राम’