राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजी छत्रपतींचा दावा ! सर्व आमदारांना खुले पत्रे

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत असून,संख्या बळानुसार शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक तर भाजपला दोन जागावर सहज विजय मिळणे शक्य आहे.या निवडणुकीत सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी दावा केला असून,त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना खुले पत्र पाठवून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य संजय राऊत ( शिवसेना ) भाजपचे पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे,राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी.चिदंबरम यांचा कार्यकाल संपल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार असून सध्याचे पक्षीय संख्याबळाचा विचार करता शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होवू शकतो.तर भाजपचे दोन उमेदवार निवडून येवू शकतात.सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे मतांचा आकडा नसल्याने माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सहाव्या जागेवर दावा केला असून,त्यांनी आज राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना एक खुले पत्र लिहून या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे.त्यामुळे सहाव्या जागेसाठी मला अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या व अपक्ष आमदारांना केले आहे.

२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे.छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता असून, माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो असे त्यांनी या खुल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेने दावा केल्याचे समजते.संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाणार आहे.सहाव्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अंतिम निर्णय घेणार असल्याने शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस कोणता निर्णय घेणार यावर आता संभाजी छत्रपती यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Previous articleशरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद! भाजपाचा गंभीर आरोप
Next articleठरलं ! महापालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका ‘या’ महिन्यात होणार