बोम्मईंचे ट्विट म्हणजे जखमेवर मीठ,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त होयला हो करून आलेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपुमख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्विट हे जखमेवर मीठ चोळणारे असून आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत केवळ होयला होय करून आलेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

शनिवारी १७ रोजी महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत झालेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे फक्त होयला होय करून आले अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या ट्वीटबाबत तक्रार केली होती. तेव्हा ते ट्वीटर खाते आपले नसल्याचे स्पष्टीकरण बोम्मई यांनी दिले होते.त्यांचे हे ट्विट म्हणजे जखमेवर मीठ असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

सीमावादावरून गेल्या १५ दिवसापासून वाद सुरू आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्वीटर खाते हॅक झाले असल्याचा खुलासा करायला इतके दिवस का लागले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.सीमावाद चिघळला त्यावेळी अनेकांना अटक करण्यात आली.महाराष्ट्रातल्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली तेव्हा हे ट्वीटरवर झाले नव्हते. मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे असे सांगून हा खुलासा दिल्लीत बैठक बोलवेपर्यंत का थांबला होता ? असा सवाल त्यांनी विचारला.सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना यावर दोन्ही राज्यांनी कोणताही निर्णय घेवून नये असा या बैठकीत निर्णय झाला.हा काही नविन सल्ला नाही.हा वाद न्यायालयात असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा देवून त्या ठिकाणी विधानसभेचे अधिवेशन घेतले जात आहे असे सांगतानाच याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रानेच थांबायचे का ? या गोष्टींचा नुसता उहापोह करून पोहे खाऊन निघणार असतील तर त्याला काही अर्थ नाही. काल झालेल्या बैठकीत नवीन काय झाले ?, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Previous articleअरे महाराष्ट्राचा मोर्चा आहे, हिंदीत काय ? मराठी माणसांचा मोर्चा हाय..अजितदादांचा मराठी बाणा
Next articleमहाविकास आघाडीचा महामोर्चा होणार म्हणजे होणारच ! अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी ठणकावले