सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही

सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही

मुंबई नगरी टीम

ठाणे : आधीच्या सरकारवर आरोप करत भाजप  सत्तेवर आले आणि आता जेव्हा सत्ता यांच्या हातात आहे तेव्हा सिंचनावर ह्यांनी काय काम केले ? २९ हजार गावांमध्ये दुष्काळ कसा ? हे आणि असेच प्रश्न मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विचारले,  त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

? आधीच्या सरकारवर आरोप करत भाजप नेते सत्तेवर आले आणि आता जेव्हा सत्ता हातात आहे तेव्हा सिंचनावर ह्यांनी काय काम केलं? २९ हजार गावांमध्ये दुष्काळ कसा? हे आणि असेच प्रश्न मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विचारले, मुख्यमंत्री ह्या प्रश्नांची उत्तरं का नाही देत आहेत?

?दुष्काळी परिस्थितीत माझे महाराष्ट्र सैनिक पक्षातर्फे गावोगावी काम करतंच आहेत. भयावह दुष्काळ आहे हे मान्य पण फक्त दुष्काळ पर्यटन करणं मला योग्य वाटत नाही.

?टँकर लॉबी महाराष्ट्रात त्यांच्या हितसंबंधांसाठी पाणीटंचाई निर्माण करत आहेत, गावांना सहज पाणी मिळू नये म्हणून टँकर लॉबी सक्रिय झाली आहे, त्यांचे राजकीय हितसंबंध आहेत का हे एकदा तपासायला हवं?

?सामाजिक संस्था आज दुष्काळात काम करत आहेत, शासकीय अधिकारी त्या उपक्रमांमध्ये आहेत, मग सरकार काय करतंय?

?हे जे लोकप्रतिनिधी सरकारच्या पैशांवर परदेशी अभ्यास दौरे करतात त्यांना एकदा बसवून विचारा कि काय अभ्यास करून आलात, वाळवंट असलेल्या इस्रायलला शेती बघायला जातात पण महाराष्ट्राच्या सुपीक जमिनीचा का वाळवंट केलात?

?आज एक गमतीशीर माहिती मिळाली आहे, संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव झालाय कि ह्यापुढची सर्व युद्ध पावसाळ्यात होतील जेणेकरून कुणी बाँम्ब टाकले हे कळणारच नाही आणि ह्या युद्धतंत्राचे जनक आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांच्या अशा दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं हसं होतं आहे. देश म्हणजे काय थट्टा आहे का?

?नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. त्यांनी देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटायची गरज नाही आणि नवाज शरीफला केक भरवताना त्यांनी ठरवायला हवं होतं देशभक्त कोण? देशद्रोही कोण?

?मोदींनी धार्मिक आणि जातीय तेढ कितीही निर्माण केली तरी जनता सुज्ञ असते, आता ते जनतेची दिशाभूल नाही करू शकत.

?दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन नसतो. दहशतवादाला आणि दहशतवाद्याला तिथल्या-तिथे ठेचलं पाहिजे.

?२०१४ ला जी आश्वासनं मोदींनी दिली, त्यातली किती पूर्ण केली? योजनांचं काय झालं? ह्यावर मोदी का काहीच बोलत नाहीत ?

?अमित शहांनी एका सभेमध्ये मोदींच्या शिक्षणाची प्रमाणपत्रं दाखवली. आमचा पंतप्रधान सुशिक्षित आहे कि नाही हा आमचा आक्षेप नव्हता तर तो सुज्ञ असावा हि आमची अपेक्षा आहे. अमेरिकेत ट्विन्स टॉवर पाडणारे दहशतवादीही सुशिक्षित होते पण ते सुज्ञ नव्हते. आमच्या बहिणाबाई चौधरी अशिक्षित असतील पण त्या सुज्ञ होत्या. आमचे राज्यकर्ते सुज्ञ असावे हि आमची अपेक्षा आहे.

?कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार ह्यांनी मोदींना प्रश्न विचारला कि आंबा कापून खायचा कि चोखून खायचा? ठाण्यात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी तो चोपून खाल्ला.

?शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीचं सरकारचं धोरण आहे नं, मग ठाण्यातील आंबे विक्रेत्यांनी काय घोडं मारलं होतं? वर्षातून एकदा १ महिन्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ते आंबे विक्रेते येतात तर करू देत ना धंदा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं भलं होतंय तर त्याला विरोध का होतोय?

?पत्रकारांनी, विचारवंतांनी सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोललंच पाहिजे, उद्या आमचं सरकार येईल तेव्हा तुम्हीही निर्भीडपणे आमचंही मूल्यमापन केलंच पाहिजे.

?आरक्षणाच्या नावावर ह्या सरकारने फक्त तरुणांना-तरुणींना झुलवत ठेवलं, आताही मुलं-मुली आंदोलन करत आहेत मग मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ज्या भाजपच्या नेत्यांनी पेढे वाटले होते ते कुठे गेले आता? राज्य सरकारला फक्त आरक्षणाच्या विषयावर फसवणूक करायची आहे.

जे खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्या क्षेत्रात आरक्षण नसतं मग आरक्षणाची स्वप्न त्या मुलांना का दाखवताय, कुठून नोकऱ्या मिळणार आहेत त्यांना? माझं नेहमी म्हणणं असतं कि महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये इथल्या स्थानिक मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाचा विषयच येणार नाही

Previous articleनदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा
Next articleविद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क सरकारला कोणी दिला ?