मुंबई नगरी टीम
अहमदनगर : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपकडून टीकेचा सूर उमटताना दिसत आहे. एकनाथ खडसे हे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. खडसे हे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.यावर अधिक बोलताना राम शिंदे म्हणाले, ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. ही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये खडसे हे प्रमुख साक्षीदार होते. तर त्यांची साक्ष यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे खडसे यांना फोडून काहीही उपयोग होणार नाही. या प्रकरणी आरोपींवर निश्चितच कारवाई होईल, असे शिंदे यांनी म्हटले.
यावेळी राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. भाजपचे १० ते १२ आमदार आमच्या संपर्कत असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. मात्र त्यांच्यासोबत एकही आजी-माजी आमदार गेलेला नसून राष्ट्रवादीत कोणतीही भरती होणार नसल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.तसेच खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमध्ये कोणतीही भरती-आहोटी येणार नसल्याचेही ते म्हणाले.