मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील कथित घोटाळाच्या चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावली आहे. बँकेशी संबंधित कागदपत्रे घेऊन त्यांना २९ डिसेंबरला ईडी कार्यलयात हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिशीनंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. यावर आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची कारवाई ही राजकीय हेतून प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडी अशा कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सोमवारी मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पत्रकारांनी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, ईडीची नोटीस बजावणे हे सगळे राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे आपल्याला माहित आहे. पण महाविकास आघाडी अशा कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे असे सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस बजावत त्यांची चौकशी केली होती. त्यामुळे मोदी सरकार राजकीय आकसापोटी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहे.
ईडीच्या नोटिशीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मी काही सांगत नसून सगळे भाजपचे लोक सांगत आहेत, असे ते म्हणाले. मला ईडीची नोटीस आल्याचे भाजपचे लोक सांगत आहेत. कालपासून बघत आहे अजून कुणीही आलेले नाही. आता मी माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणसू निघाला असेल मग पाहून घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत. याचा तपशील जाणून घेण्यासाठी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वीच ईडीने अटक केली होती