मुंबई नगरी टीम
मुंबई । महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ नावंची शिफारस करूनही या यादीला अजूनही मंजूरी मिळाली नसल्याने सत्ताधारी नाराज असल्याची चर्चा असतानाच राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ६ आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भातील एक बनावट पत्र ( fake letter) सध्या समाज माध्यमात फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे तर या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांची स्वाक्षरी आणि शिक्का असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त (Governor appointed) १२ आमदारांच्या जागा रिक्त असल्याने महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भात १२ नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे.मात्र मोठा कालावधी उलटूनही या यादीला अद्याप मंजूरी मिळाली नसल्याने महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात यावरून अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असतानाच राजभवन कर्यालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना लिहिलेले ६ जणांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी नियुक्ती करण्यात यावी अशा आशयाचे शिफारस पत्र आज दिवसभर समाज माध्यमात फिरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.२९ सप्टेंबर २०२० मध्ये लिहिलेल्या या पत्रात वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय),सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय),जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांची नावे असून, यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी निवड करावी अशी शिफारस मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती करण्यात आली आहे.य पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी आहे.मात्र हे पत्र बनावट (fake letter) असल्याचा खुलासा राजभवन कार्यालयातून करण्यात आला आहे.
दरम्यान, राजभवन कार्यालयातून पाठविलेल्या या बनावट पत्रावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र बनावट असेल तर त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, राज्यपाल भवनातून अशा पद्धतीने बनावट पत्र जातात का ? हे पत्र कोठून आले,कोणी आणले आणि कोणत्या व्यक्तीने आणले याचा तपास होण्याची गरज आहे,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.या पत्रावर राज्यपालांची स्वाक्षरी आणि शिक्का आहे.त्यामुळे राजभवनाबाहेर राज्यपालांच्या नावाने काही खेळी खेळल्या जात आहेत का ? असा सवाल करतानाच अशा पद्धतीच्या काही गडबडी होत आहेत का, कोणाला आमदार बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.या पत्रावरील स्वाक्षरी आणि शिक्का तपासून त्यात काही आर्थिक घोटाळे आहेत का, याचे स्पष्टीकरण समोर आले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असल्याने अशा प्रकारचे बनावट पत्र समोर येत असेल तर त्याची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे असेही पटोले यांनी सांगितले.