सरकारला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलय : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज ठाकरे यांनी कायदा हातात घेऊन जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिल्यानंतर जर सरकार काम करत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अमलबजावणीसाठी यापुढेही असेच वागायचे का? महाविकास आघाडी सरकार आता जी कायदेशीर अंमलबजावणी करणार आहे ती आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून करायला हवे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

सरकारने भोंग्यांच्याबाबतीत नियमावली ठरवून दिली आहे. त्याबाबत विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारनेच राज्यस्तरीय धोरण म्हणून या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. काही जिल्ह्यांत वाद निर्माण होईल आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. कायदा सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. सर्वांना कायदा समान असतो. जर काही धर्मियांचे लांगूलचालन होणार असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन होणार नसेल तर कायदा हातात घेतला जातो आणि राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करावे लागते हे योग्य आहे का मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांशी बोलून हा निर्णय घेतल्याचे समजले.राज ठाकरे आणि हिंदू बांधवांच्या भावनांची कदर करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी केली, तर आंदोलनाची आवश्यकता पडणार नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

कॉँग्रेसच्या स्थापनेपासून कोणी कोणाचे लांगूलचालन केले हे नानांना माहीत आहे

नाना पटोले यांनी कॉँग्रेसचा पूर्वइतिहास तपासून पाहावा. आता हिंदू- मुस्लिम तेढ निर्माण होण्याच्या गोष्टी नाना करतायत.पण कॉँग्रेसच्या स्थापनेपासून कोणी कोणाचे लांगूलचालन केले आहे, याची त्यांना कल्पना आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
भोंग्याच्या प्रकरणावरून हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण केली जात आहे, असे वक्तव्य कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिंदू आता संघटित झाले आहेत. म्हणून राहुल गांधीसहित सगळ्या नेत्यांमध्ये मंदिरात जाण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे.एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करून हिंदू- मुस्लिमांत तेढ वाढवण्याची कॉँग्रेसची भूमिका सातत्याने कारणीभूत ठरली आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

Previous articleधार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला!
Next article६ आमदारांच्या नियुक्तीच्या ” त्या ” बनावट पत्रामुळे खळबळ ; चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी