मनसेला खर्चाचा तपशिल मागणे केवळ औपचारिकता ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणा-या उमेदवारांना खर्चाची मर्यादा असली तरी राजकीय पक्षांना अशी कोणतीही मर्यादा नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात घेतलेल्या सभांच्या खर्चाचा तपशिल मागितला असला तरी त्यातून पक्षाला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध भागात लाखोंच्या सभा घेतल्याने सत्ताधा-यांचे धाबे दणाणले. राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मागण्यावरून संभ्रम निर्माण झाला असतानाच भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारी नंतर मुख्य निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार मनसेला राज्य निर्वाचन अधिकारी यांनी नोटीस बजावली होती.मात्र मनसेने दिलेल्या खर्चाचा तपशिल पडताळून पाहण्याची देखील कोणतीच यंत्रणा आयोगाकडे नसल्याने पक्षाने जे काही तपशील दिले ते दप्तरी नोंदवून घेण्यापलिकडे फारशी काही औपचारिकता या मागे नसल्याचे सूत्रांकडून समजते. राज्य निर्वाचन अधिकारी यांनी नोटीस बजावली असली तरी लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवारच नसल्याने खर्चाचा तपशिल देण्याचे बंधन मनसेला घालता येत नसल्याचेही या सूत्राचे मत आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात घेतलेल्या प्रचारसभांच्या खर्चाचा तपशिल देण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले होते. पक्षाचा एकही उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी संपुर्ण राज्यात ९ सभा घेतल्या होत्या, ठाकरेंना प्रचारसभांचा खर्च सादर करावा लागणार, असल्याचे निवडणुक अधिकारी दिलीप शिंदें यानी सांगितले होते. मात्र आपल्याकडे अजून या संदर्भातले कुठलेही निवडणुक आयोगाचे पत्र पोहचले नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुत्रांनी सांगितले.
लाव रे तो व्हिडीओ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टिका करुन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे निवडणुकी दरम्यान चांगलीच लोकप्रिय झाली होती,मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने या प्रचारसभांचा खर्च कुणाच्या खात्यात जाणार या बाबत स्पष्टता नव्हती,भाजपानेही या निवडणुकीच्या खर्चाबाबत आक्षेप घेतला होता,शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात पक्षाच्या वतीने आयोगाला पत्र लिहीले होते.