अखेर ठरलं… १४ जूनला  मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

अखेर ठरलं… १४ जूनला  मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, येत्या १४ जून रोजीचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. दिल्लीतील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच १४ जूनला केला जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या दोन आणि शिवसेनेच्या कोट्यातून एकाला मंत्रिपदी संधी दिली जाणार असल्याची चर्चा असून, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना विस्तारात संधी दिली जाणार आहे.

माजी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधनामुळे तर शिवसेनेचे मंत्री दिपक सावंत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा  अनेक दिवसांपासून होती. गेल्याच आठवड्यात दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत  यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. येत्या १७ जून पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, त्यापूर्वी म्हणजे १४ जूनला  मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,असे सूतोवाच मुनगंटीवारांनी केले आहे. काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असून,त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. विखे पाटील यांच्याकडे कृषी खाते सोपविले जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात भेटीगाठींना मोठा वेग आला आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात  भेट घेवून चर्चा केली. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास कोळंबकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केली. माजी कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधनामुळे तर दिपक सावंत आणि गिरिश बापट यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील तीन जागा रिक्त आहेत.त्यामुळे भाजपकडून दोन तर शिवसेनेकडून एकाला विस्तारात संधी दिली जाईल.भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मराठवाड्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

Previous articleआ. प्रविण दरेकर यांची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास समितीवर “तज्ञ सदस्य” म्हणून नियुक्ती
Next articleसीबीएसई आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत