महाराष्ट्र हे छत्रपतीचे राज्य आहे दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही: शरद पवार

महाराष्ट्र हे छत्रपतीचे राज्य आहे दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही: शरद पवार

मुंबई नगरी टीम 

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतीचे राज्य आहे. आमच्या लोकांवर तसे संस्कार झाले आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नाही असा इशारा देतानाच शिखर बँक घोटाळ्याप्रकारणी २७ तारखेला दुपारी २ वाजता ईडी कार्यालात स्वत: जाणार आणि ईडीचा पाहुणचार घेणार, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.काल संध्याकाळी माध्यमांकडून ईडीची माहिती कानावर आली त्यामध्ये शिखर बॅंक प्रकरणी केस दाखल केली असून,त्यामध्ये माझे नाव असल्याचे समजले असे पवार यांनी सांगत,हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहीत नाही. जळगाव ते नागपुर अशी दिंडी काढली होती त्यावेळी अटक केली होती.माझ्या आयुष्यात गुन्हा दाखल होण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. तरीही शिखर बँक घोटाळ्याप्रकारणी २७ तारखेला दुपारी २ वाजता ईडी कार्यालात स्वत: जाणार आणि ईडीचा पाहुणचार घेणार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत स्पष्टीकरण केले.

पवार म्हणाले की, ईडीने माझ्यावर शिखर बँक प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मी कुठल्याही बँकेचा संचालक नाही. तरीही माझ्यावर नक्की गुन्हा काय दाखल केला आहे ते मला समजून घेतले पाहिजे. ते मी जाणून घेणार असून ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मी संपूर्ण महिनाभर मुंबईबाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर मी एकदम अदृष्य झालो असे वाटू नये म्हणून येत्या शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा पाहुणचार स्वीकारणार आहे. ईडीच्या अधिका-यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देणार आहे. फुले, शाहुंच्या विचाराने चालणारे आम्ही आहोत. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्यावर विश्वास ठेवणारा मी आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करणार आहे असेही पवार म्हणाले .राज्य सहकारी बँक ही महत्वाची बँक आहे. ही बँक सगळ्यांना अर्थसहाय्य करते. सध्या ज्या कालखंडाबाबत चौकशी होते आहे, त्या संचालक मंडळात कोणत्याही एका पक्षाचे संचालक नव्हते. ही सर्वपक्षीय सदस्य बँक आहे. मी राज्य सहकारी बँकेचा संचालक वा सदस्य कधीच नव्हतो असेही पवार यांनी सांगितले. खोलात जावू इच्छित नाही पण सध्या राज्यात राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानेच आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, अशी लोकांना शंका आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे झाल्याने  लोक काय ते समजतात, असाही टोला पवार यांनी लगावला.

Previous articleसंचालक नसतानाही  माझ्यावर गुन्हा दाखल : शरद पवार
Next articleविरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर