संचालक नसतानाही  माझ्यावर गुन्हा दाखल : शरद पवार

संचालक नसतानाही  माझ्यावर गुन्हा दाखल : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सहकारी बँकेवर अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र मी त्या संस्थेचा सभासदही नव्हतो, त्यात माझे नाव गोवले गेले. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नसून, राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.

सहकारी संस्थांना त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कर्ज देण्याची जबाबदारी संबंधित बँक संचालकांनी घेतली. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले असे सांगतानाच मी राज्यातील कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर नाही. संचालक मंडळाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही.तक्रारदारांनी बँकेच्या अनियमततेविषयी तक्रार केली आहे. त्यांनी माझ्या विचारांच्या संचालकांनी अनियमतता केली असे म्हटले. हा त्यांच्या तक्रारीचा भाग असून, त्याचा आधार घेऊन पोलीस आणि ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो असेही पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.सहकारी संस्थांना मदत करणे कोणताही गुन्हा नाही. आज माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर त्यांचे मी स्वागत करतो. राज्यातील दौ-यात मी अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तरच मला आश्चर्य वाटले असते. निवडणुकीच्या तोंडावर या कारवाया होत आहेत. महाराष्टातील जनतेसमोर हे आल्यावर त्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल असेही पवार म्हणाले. पोलीस असो की ईडी असो, मी संबंधित बँकेत संचालक नसतानाही त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करणे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला मिळणारा प्रतिसाद पाहता होत आहे, असा टोला  पवार यांनी लगावला .

Previous articleशरद पवार अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल
Next articleमहाराष्ट्र हे छत्रपतीचे राज्य आहे दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही: शरद पवार