शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढा
मुंबई नगरी टीम
मुंबई : हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी कमालीचे खचले आहेत. पीक उद्ध्वस्त झाल्याने हतबल शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या किंवा त्यांना हृदयविकाराचा धक्का येण्याच्या घटना समोर रोज समोर येत आहेत. या पार्श्वभूमिवर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने भरीव आर्थिक मदत जमा करून दिलासा द्यावा आणि त्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मागील दोन दिवसात राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांनी सरकारने या घटनांची गांभिर्याने नोंद घेण्याची आवश्यकता विषद केली. ते म्हणाले की, हा शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण काळ आहे. मराठवाडा, विदर्भापासून कोकणापर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाने उभे पीक नष्ट केले आहे, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अगोदरच आर्थिक संकटात फसलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा धक्का असून, यावेळी सरकारने तत्परतेने, सक्षमतेने ठोस मदत देण्याची गरज आहे.
भाजपच्या कार्यकाळात यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या, मदत जाहीर करण्यात आली. मात्र, बहुतांश घोषणा पोकळ ठरल्या. सरकारने जाहीर केलेली मदत सर्व शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात मिळू शकली नाही. दीडपट हमीभाव, कर्जमाफी, पीकविमा, बोंडअळीची भरपाई अशी या सरकारची एकही घोषणा शेतकऱ्यांना भक्कम आधार देऊ शकलेली नाही. या सरकारच्या उपाययोजना प्रभावी असत्या तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असते. पण शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी न होणे, हे या सरकारचे कृषीधोरण फसल्याचे द्योतक आहे, असे चव्हाण म्हणाले.
या नैसर्गिक संकटात तरी सरकारने मागील चुकांची पुनरावृत्ती करू नये. पंचनामे व प्रशासकीय कार्यवाही करताना नियमांकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. शेतकऱ्यांना मदत देताना केवळ एनडीआरएफचे निकष ग्राह्य धरू नयेत. तर कोरडवाहूला हेक्टरी सरसकट ५० हजार तर फळबागांना हेक्टरी १ लाख रूपये मदत जाहीर करावी आणि त्याचे वितरण तातडीने करावे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून वेगळी भरीव मदत मिळवून द्यावी. पुरेशा संख्येने शासकीय शेतमाल खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून शेतकऱ्यांचा खराब झालेला शेतमालही हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली आहे.