उतणार नाही मातणार नाही,जनसेवेचा वारसा सोडणार नाही : धनंजय मुंडे

उतणार नाही मातणार नाही,जनसेवेचा वारसा सोडणार नाही : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

परळी : परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत.त्यामुळे त्यांच्या कायम ऋणात राहता यावे आणि आयुष्यभर त्यांची सेवा करता यावी याच माध्यमातून काम करणे म्हणजे त्यांचे खरे आभार मानणे ठरणार आहे.त्यामुळेच मला आज आभार मानण्याची संधी मिळाली नसावी, असे म्हणत धनंजय मुंडे आज परळीतील हजारो मतदारांसमोर नतमस्तक झाले.एखादा प्रश्न चुटकीसरशी कसा सोडवायचा याबाबत शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्याच माध्यमातून जनतेसाठी झटणार. उतणार नाही मातणार नाही,जनसेवेचा वारसा सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर परळीत त्यांचा अभूतपूर्व असा सत्कार करण्यात आला सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मिरवणूक स्टेजवर येण्यास रात्रीचे दहा वाजले. ध्वनिक्षेपकाच्या वेळेचा कायदा असल्यामुळे त्यांनी भाषण करणे टाळले आणि व्यासपीठावर नतमस्तक होत जनतेचे आभार मानले. ध्वनिक्षेपक बंद ठेवून त्यानंतर तब्बल रात्री एक वाजेपर्यंत  जमलेल्या जनसमुदाया कडून स्वागत स्वीकारले. बीड जिल्ह्याच्या माजी खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री पंडितराव दौंड ,आमदार प्रकाश दादा सोळंके , आमदार संदीप भैय्या क्षीरसागर,  आमदार बाळासाहेब आजबे,आमदार बाबाजानी दुर्राणीमाजी आमदार अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे,जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संजय दौंड ,नगराध्यक्षा सौ सरोजनीताई हालगे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज मला याठिकाणी बोलण्याची संधी मिळाली नसली तरी कदाचित आगामी काही दिवसातच मतदारसंघाच्या भल्यासाठीचा एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन माझ्या हाताने व्हावे आणि त्यावेळी त्यांचे आभार मानावेत हे नियतीच्या मनात असावे असे म्हणत माध्यमांसमोर बोलताना परळीच्या जनतेच्या कायम ऋणात राहणे आपल्याला आवडेल असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. स्व. पंडित अण्णा मुंडे, स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जे प्रेम मायबाप जनतेने दिले तेच प्रेम परळीच्या मायबाप जनतेने मला दिले. स्वागत आणि भव्य दिव्य रॅलीमुळे मला माझ्या लोकांशी संवाद साधता आला नाही. त्यांचे ऋण व्यक्त करता आले नाही. मात्र परळीच्या एखाद्या विकासकामाच्या शुभारंभाप्रसंगी मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधणार असे ते म्हणाले.माझी नाळ ही परळीच्या मातीशी जुळलेली आहे आणि माझा जीव या मातीतल्या माणसात आहे. म्हणूनच मी या मातीतल्या माणसाला मोठे करण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि ते मी पूर्ण करणारच. सामाजिक न्याय मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. सरकार म्हणून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणारच असा शब्द त्यांनी दिला.आई वडील जसं मुलावर प्रेम करतात तसंच एका मुलाप्रमाणे मी परळीच्या मायबाप जनतेवर प्रेम करणार. विरोधी पक्षनेता होतो तेव्हा लोकांचे प्रश्न सभागृहात, सभागृहाबाहेर मांडले हा माझा वारसा आहे. हा वारसा मी कायम जपणार. एखादा प्रश्न चुटकीसरशी कसा सोडवायचा याबाबत शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्याच माध्यमातून जनतेसाठी झटणार. उतणार नाही मातणार नाही, जनसेवेचा वारसा सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

Previous articleविजय वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खाते
Next articleमनसेसोबत युती केल्यास भाजपाचे नुकसान : रामदास आठवले