रक्तात बेईमानी नाही त्यामुळे पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

रक्तात बेईमानी नाही त्यामुळे पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

मुंबई नगरी टीम

परळी : मला वाघीण असे म्हटले गेले, एक लक्षात ठेवा वाघीण कधीही आपलं जंगल सोडत नाही आणि कोणत्याही पराभवाने मी खचणार नाही मी पक्ष सोडणार नाही असे जाहीर करतानाच आज मी मुक्त आहे, ज्याचा कोणी नाही त्याचा आधार बनणार आहे. समाजातील सर्व जाती धर्माच्या माणसांची ‘स्वाभिमानी वज्रमुठ’ बांधण्याचे काम आता मी करणार आहे, त्यासाठी लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा माजी मंत्री आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी आज येथे केली. पुढील महिन्यात २७ जानेवारीला मराठवाड्याच्या प्रश्नांवर औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जेष्ठ नेते हरीभाऊ बागडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खा.डॉ. प्रितमताई मुंडे, पाशा पटेल, सुजितसिंह ठाकुर, आ. अतुल सावे, आ. मोनिका राजळे, आ. नारायण कुचे, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ नमिता मुंदडा, आ.राजेश पवार, आ. श्वेता महाले, आ. माधुरी मिसाळ, आ. आकाश फुंडकर, आ. तुषार राठोड आदींसह राज्यभरातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी सर्वांसाठी काम करणार आहे. आतापर्यंत परळीसाठी बांधील होते पण आता राज्यभरातील प्रत्येक समाजघटकांसाठी काम करायला मुक्त झाली आहे, तेच काम करणार आहे. आमच्या रक्तात बेईमानी नाही त्यामुळे पक्ष सोडणार नाही. पुढे काय करायचे ते करूच, पण मी पक्ष सोडून जावे यासाठीच तर हे सगळे प्रकार झाले. मी पक्ष सोडून जाणार असल्याच्या बातम्या कोणी पेरल्या याचा शोध पक्षाने घ्यावा तसेच मी एखादे पद मिळावे म्हणून पक्षावर दबाव आणतेय असं पक्षातील कोणाचं मत असेल तर मला कोअर कमिटी सदस्य पदावरूनही मुक्त करा. मुंडे साहेब स्वाभिमानी होते आता त्यांच्या नावाने पदर पसरणार नाही. आपल्या ताकतीवर गोरगरीबांची सेवा करणार आहे. माझ्या तुमच्याकडून अपेक्षा नाही, तर नाराज कशी आणि कोणावर व्हायचं असेही त्या यावेळी म्हणाल्या. गेल्या बारा दिवसांपासून टिव्हीवर माझी चर्चा सुरू आहे. सुत्रांकडून अनेक बातम्या येत होत्या. मग जेंव्हा फडणवीस, अजित पवारांनी शपथ घेतली ते कसं सुत्रांना कळलं नाही असा टोला त्यांनी लगावला. राज्यात पुन्हा भाजपचं सरकार यावं म्हणून मी फिरत होते, एक एक आमदार निवडून यावा म्हणून प्रयत्न करत होते. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे पक्षाने आधीच जाहीर केले होते मग मी बंड कशी करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पक्ष कुणाच्याही मालकीचा नसतो, पक्ष ही एक प्रक्रिया आहे. हे कुणीही विसरु नका. जनसंघापासून भाजपची सुरूवात झालेली आहे. भाजपामध्ये आधी आडवाणी, वाजपेयी यांचे युग होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे भाजपचे नेतृत्व आहे. मुठभरांचा असलेला हा पक्ष वाडी-वस्ती-तांड्यावर नेण्याचे काम मुंडे साहेबांनी केले त्यामुळे या पक्षाला पुन्हा माघारी आणण्याचे काम करु नका. भाजप हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे त्यामुळे तो मी का सोडू? असे त्या म्हणाल्या. माझ्यासाठी राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि मग मी स्वतः अशी आमची परंपरा आहे. कोणत्याही पराभवाने मी घरात बसणारी नाही त्यामुळे खचून जाणार नाही. कार्यकर्त्यांनी देखील पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. समाजातील सर्व जाती धर्माची वज्रमुठ करून व हातात मशाल घेवून सर्वसामान्य माणसांसाठी लढा देणार आहे असे सांगत पुढील महिन्यात २६ जानेवारीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मुंबईतील वरळीचे ऑफीस पुन्हा सुरू करणार असुन २७ तारखेला औरंगाबाद येथे मराठवाड्यातील प्रश्नांसाठी लाक्षणिक उपोषण करणार आहे. पुढील काळात शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्यांसाठी लढा उभारणार असल्याचे त्या म्हणाल्या.

क्षणचित्रे
‘शांत बैठी हूं तो ए मत समझना की आग नही है मेरे अंदर, डरती हूँ कहीं समंदर कम ना पड जाये बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घणाघाती भाषण केले. पंकजाताईंचा पराभव झाला नाही तर त्यांचा पराभव घडवून आणला हे पक्षातील अनेकांच्या बाबतीत घडले. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ अशी परिस्थिती पक्षात होती. मी पंकजाताईंसोबतच आहे पण आज पक्षात माझी जी गुदमरल्यासारखी परिस्थिती केली गेली याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला.

भाजप एक कुटूंब आहे, पक्षाच्या नाही पण माणसांच्या चुका झाल्या असतील, पुढील काळात सर्व कांही नीट होईल. वेदनेची व तक्रारीची दखल घेतली जाईल असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जयंतीनिमित्त मुंडे साहेबांची समाधी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती, व्यासपीठावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे, प्रज्ञा मुंडे, प्रितम मुंडे व उपस्थित मान्यवर नेत्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

खा.डॉ. प्रितमत मुंडे, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, हरीभाऊ बागडे, पाशा पटेल यांचेही यावेळी भाषणे झाली.
‘कोण आली रे कोण आली’, महाराष्ट्राची वाघीण आली’, ‘पंकजाताई मुंडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘अमर रहे अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे’ अशा घोषणांनी गोपीनाथगड परिसर दुमदूमुन गेला होता.

लोकनेत्याचे अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कांही शाहीर मंडळींनी मुंडे साहेबांच्या जीवनावर पोवाडे गायले.

कार्यक्रमास माजी आमदार भीमराव धोंडे, केशवराव आंधळे, आदीनाथ नवले, सुधाकर भालेराव, प्रा.टी.पी.मुंडे, रमेश आडसकर, गणेश हाके, राजेश देशमुख, बालासाहेब दोडतले, देविदास राठोड, बदामराव पंडीत, रमेश पोकळे, शिवाजीराव कर्डीले, विजय गव्हाणे, सविता गोल्हार, भागवत कराड, भाऊराव देशमुख, राधाताई सानप आदींसह अनेक नेते उपस्थित होते.

Previous articleखातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास
Next article…अन शिष्याने गुरूंना बांधला फेटा!