जमीनी परत कराव्या लागणार असल्याने गुजरातच्या मध्यस्थांचे धाबे दणाणले

मुंबई नगरी टीम
मुंबई : नाणार प्रकल्प रद्द केला असून,नाणार वासीयांची जी भूमिका आहे, तीच भूमिका शिवसेनेची आहे.नाणार समर्थनात झालेला मेळावा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही.या मेळाव्याला आंबा व्यापा-यांकडे काम करणा-या नेपाळी लोकांना आणले गेले होते आणि त्यांना शिवसेनेचे असल्याचे भासविले गेले.या प्रकल्पासाठी गुजरात मधील लोकांनी जमीनी घेतल्या आहेत आता त्या शेतक-यांना परत कराव्या लागणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे असे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

सामंत म्हणाले, शिवसेनेची भूमिका ही कायम जनतेसोबत राहण्याची राहिली आहे. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत.नाणार समर्थनात घेण्यात आलेल्या मेळाव्याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट करून,राजापूर मधील आंबा व्यापा-यांकडे असलेल्या नेपाळी कामगारांच्या गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून त्यांना या मेळाव्यात आणून ते शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे भासवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रिफायनरीच्या विरोधात झालेल्या मेळाव्याला सुमारे सात हजारांची उपस्थिती होती. तर कालच्या मेळाव्याला दोनशे जण होते.या प्रकल्पासाठी गुजरात मधील लोकांनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या होत्या आता हा प्रकल्प रद्द झाल्याने त्या शेतक-यांना परत कराव्या लागणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.शेतक-यांना जमीन परत द्यावी लागणार असल्याकारणाने त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे सगळे राजकारण केले जात आहे, असे सामंत यावेळी म्हणाले.

Previous articleमुस्लिम आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
Next articleकडोंममधून वगळलेल्या २७ गावांचे लवकरच नगर परिषदेत रूपांतर