परराज्यातील मजुरांना अन्न निवारा नको,त्यांना घरी जायचयं : आदित्य ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील टाळेबंदी येत्या ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.या टाळेबंदीमुळे देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजुर अडकले आहेत.टाळेबंदीमुळे आपल्या मुळ गावी जाता येत नसल्याने या अगोदर गुजरात मघील सुरत शहरात मजुरांचा उद्रेक झाला होता.आता टाळेंबंदी येत्या ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर परराज्यातील मजुरांनी हजारोच्या संख्येने जमून आपल्या गावी जाण्यासाठी हटून बसल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे.या घटनेवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात येत्या ३ मे पर्यंत टाळेबंदी वाढविण्याची घोषणा केली  आहे.या टाळेबदीमुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार अडकले आहेत. गेल्या २१ दिवसांची टाळेबंदीची मुदत आज संपत होती.मात्र पंतप्रधानांनी आज टाळेबंदी वाढविण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईत अडकलेल्या परराज्यातील कामगारांचा उद्रेक झाल्याचे चित्र होते.सायंकाळच्या दरम्यान वांद्रे स्थानकाबाहेर परराज्यातील हजारो कामगारांचा मोठा जमाव जमला होता.टाळेंबंदीचाविरोध करत या कामगारांनी आपल्या मुळ गावी जाण्याची मागणी लावून धरली होती. आपल्या गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी हे कामगार करत होते.पोलिसांनी वारंवार सूचना करूनही जमाव पांगत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

या घटनेवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला दोषी ठरवत टीका केली आहे.केंद्र सरकार परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य निर्णय घेत नाही.या परराज्यातील कामगारांना निवारा आणि अन्नाची गरज नसून,त्यांना आपल्या गावाला जायचे आहे,वांद्रे  आणि सुरतमधील घटना ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे, असा आरोप करून,या मजुरांना अन्न किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परत जायचे आहे.असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी सरकारला दोषी ठरवले आहे.

Previous articleकोरोनाचा प्रादुर्भाव नसणा-या जिल्ह्यातील उद्योग धंदे सुरू करणार ?
Next articleपरराज्यातील मजुरांनो चिंता करु नका,तुम्ही महाराष्ट्रात आहात : मुख्यमंत्री