…तर राजीनाम्याची गोष्ट दिल्लीपर्यंत जाईल: संजय राऊत

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरील सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. राजीनाम्याचे बोलत असाल तर, ही गोष्ट दिल्लीपर्यंत जाईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

सीबीआय संदर्भातील जो निर्णय झाला आहे त्यावर राज्याचे महाधिवक्ते, मुंबई पोलीस प्रतिक्रिया देतील. यावर राजकीय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. विरोधकांनी विचार करून टीका करायला हवी. राजीनामे मागणे योग्य नाही. राजीनाम्याची गोष्ट दिल्लीपर्यंत जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे केला. कायदेशीर लढाईमध्ये असे निर्णय येतच असतात. मात्र मुंबई पोलिसांविरोधात हे षडयंत्र रचण्यात आले आहे. यामुळे राज्याची बदनामी झाली.  राज्याची अशी बदनामी करणे योग्य नाही. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. निकालपत्र हाती आल्याशिवाय बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान गेले दोन महिने सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून वादंग सूरू होता. त्यात या प्रकरणाला राजकीय वळण दिले जात असून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत राज्यातील विरोधकांसह सुशांतच्या चाहत्यांनी सीबीआय चाैकशीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. यावरून आता विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Previous articleआजी,माजी सैनिकांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Next articleसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल