सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवत  सर्वाेच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. हीच संधी साधत विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत सत्ताधा-यांना खडेबोल सुणावले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, “सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयामुळे एकुणच न्यायव्यस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा”, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे हे दुर्दैवी आहे. सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल”, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले. यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, “सर्वसामान्य जनतेच्या मनात या प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळे सीबाआय चाैकशीची अपेक्षा होती. ती न्यायालयाने दिली. त्यामुळे ‘दुध का दुध पानी का पानी’ हे या प्रकरणात होईल. जनतेला अपेक्षित आहे तेच होईल. मुंबई पोलीस असो वा बिहार पोलीस किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असो. मात्र हे प्रकरण पारदर्शक पणे पुढे येणे हाचा अंतिम उद्देश आहे. सीबीआय चाैकशीतून सत्य स्थिती देशाच्या समोर येईल”, अशी भूमिका दरेकरांनी मांडली.

भाजप नेते नितेश राणे यांनी “आता बेबी पेंग्विन तर गेला”, असे ट्वीट केले आहे. तर त्यांचे हे ट्विट अप्रत्यक्षपणे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवणारे आहे. यासह राम कदम, आशिष शेलार आदींनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, न्यायालयाचा हा निकाल सुशांतच्या चाहत्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. मात्र या निकालामुळे सत्ताधा-यांना डिवचण्यासाठी विरोधकांना आयती संधीच मिळाल्याचे दिसत आहे.

Previous article…तर राजीनाम्याची गोष्ट दिल्लीपर्यंत जाईल: संजय राऊत
Next articleहसन मुश्रीफांची सवय म्हणजे “आ बैल मुझे मार” !